Home Breaking News गावातील सांडपाणी वाहून साचत असलेल्या ठिकाणी गावाचे पाणीपुरवठा विहिरीचे काम होत असल्याने...

गावातील सांडपाणी वाहून साचत असलेल्या ठिकाणी गावाचे पाणीपुरवठा विहिरीचे काम होत असल्याने काम बंद करण्याची ग्रामस्थांनी केली मागणी

80
0

विशेष प्रतिनिधी :

सावनेर/नागपूर (Saoner/Nagpur) :- सावनेर तालुक्यातील बिचवा येथे राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत विहीर व पाईपलाईनची कामे मंजूर झाली असून या कामास सुरुवात करण्यात आली आहे. या कामास गावकरी तसेच ग्रामपंचायतने विरोध दर्शविला आहे. या गावाजवळून वाहणाऱ्या नाल्या काठावर विहिरीचे बांधकाम काम सुरू करण्यात आले आहे. विहिरीचे काम सुरू आहे तेथे नाल्याने वाहत असलेले गावातील सांडपाणी साचुन राहत असते. नाल्या काठावर विहिरीचे काम घेतल्याने नाल्यातील साचलेल्या सांडपाण्याचा पाझर विहिरीत जमा होऊन विहिरीतील पाणी दूषित होऊन तेच पाणी गावकऱ्यांना प्यायला मिळेल. त्यामुळे सुरू असलेले विहिरीचे काम त्वरित बंद करण्याची मागणी गावकरी व ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन गावकरी व सरपंचाच्या वतीने पंचायत समिती व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग नागपूर यांना देण्यात आले.

सावनेर तालुक्यातील बिचवा येथे राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत सन 2021- 2022 या आर्थिक वर्षात विहीर व पाण्याच्या पाईपलाईन करिता ६४ लाखाचे काम मंजूर झाले आहे. यापैकी विहिरीचे खोदकाम कंत्राटदारा मार्फत चालू करण्यात आले आहे. तरी सदर विहिरीचे काम सुरू करतेवेळी ग्रामपंचायतीने सुचविल्यानुसार घेण्यात आले नसुन ग्रामपंचायत स्थानिक प्रशासनाला विश्वासात न घेता गावाजवळील नाल्याच्या काठावर सुरू करण्यात आले आहे. गावाजवळूनच वाहणारा हा नाला असून गावातील सांडपाणी या नाल्यात वाहून येत असते.ज्या ठिकाणी विहिरीचे खोदकाम सुरू आहे त्याच ठिकाणी नाल्यातील सांडपाणी साचुन राहत असल्याने गढुळ सांडपाण्याच्या पाझर हा विहिरीत जमा होऊन दूषित पाणी गावकऱ्यांना पिण्यास मिळेल. या नाल्या काठावरच विहीरीचे काम सुरू असल्याने भविष्यात या ठिकाणी विहिरीचे काम झाल्यास पावसाळ्यात नाल्याला येणाऱ्या पुराने विहिर खचून जाण्याच्या व पुराचे गढुळ पाणी विहिरीमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुराचे गढुळ पाणी तसेच नाल्याच्या दुषित पाण्याचा विहिरीत जमा झालेला पाझर साठा गावकऱ्यांना पिण्यायोग्य राहणार नाही‌.त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो.प्रसंगी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे गावकरी व ग्रामपंचायत चे सरपंच यांनी या कामास विरोध दर्शविला आहे. विहिरीचे चालू असलेले काम तात्काळ थांबविण्यात यावे.संबंधित स्थानिक प्रशासनाला विश्वासात घेऊन ग्रामपंचायत ने सुचविलेल्या लोकेशन नुसार कामाला सुरुवात करण्यात यावी. अशी मागणी अनेश रोकडे सरपंच बिचवा, प्रकाश राऊत, युवराज रोकडे,चंद्रभान नाखले,सुधाकर सोनवणे,सुखदेव गजभिये,सुनंदा राऊत,दिलीप शेंडे,उत्तम रागासे,राजेंद्र चिखले,भरत जनबंधू,महादेव तांडेकर,प्रशांत चौधरी आदी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रिया –

# “गावात शेजारील नाल्यात गावातील सांडपाणी वाहून येते.पाणीपुरवठा विहिरीचे बांधकाम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी या नाल्यातील गढुळ दुषित सांडपाणी जमा असते.त्या पाण्याचा पाझरा साठा विहिरीत जमा होईल.ते पाणी गावकऱ्यांना पिण्यासाठी मिळेल.ते दुषित व गढुळ पाणी पिण्यायोग्य राहणार नाही.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे.सुरू असेलले विहिरीचे काम त्वरित थांबण्यात यावे. स्थानिक प्रशासनाला विचारात घेऊन एका चांगल्या ठिकाणाची निवड करून जिथे दूषित पाणी विहिरीत जाणार नाही अशा ठिकाणी पाणीपुरवठा विहिरीचे बांधकाम करण्यात यावे. “- अनेश तुकाराम रोकडे, सरपंच ग्रा.पं.बिचवा.

# “येथील जागेवर बोरवेल करून , पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. पाणी पिण्यायोग्य असल्याची रिपोर्ट आल्यानंतरच भु- वैज्ञानिक विकास व भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा नागपूर यांनी निश्चित केलेल्या जागेवर विहिरीचे बांधकाम सुरू करण्यात आले.”- संकेत जयशिंकर, अभियंता पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती सावनेर.

Previous articleपाटणसावंगीतील सराफा व्यापाऱ्यास दरोडेखोरांनी लुटले… लाखोंचे दागिणे व रोख मुद्देमाल दुचाकीवरिल बॅग घेऊन दरोडेखोर पसार
Next articleचालकाला डुलकी येताच उलटली भक्तांची ट्रॅव्हल्स,थोडक्यात बचावले भक्तगण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here