Home Breaking News टेंभुरडोह येथे किसान विकास परिषद, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा मंथन

टेंभुरडोह येथे किसान विकास परिषद, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा मंथन

53
0

सावनेर (Saoner) :- सावनेर तालुक्यातील टेंभुरडोह येथील टायगर फोर्ट इको रिसॉर्टच्या सभागृहात किसान विकास परिषदेची सभा पार पडली.

आजवरच्या सरकारच्या विविध योजना आणि उपाययोजना कुचकामी ठरल्या असून शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी कोणत्या उपाययोजना सरकारला सुचविता येईल, यासाठी विविध क्षेत्रातील शेती प्रश्नांवर अभ्यास करणाऱ्या तज्ञांची मते जाणून घेण्यासाठी कुणबी बहुजन स्वराज्य पक्षाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले.

या परिषदेत किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब, कापूस तज्ञ विजय जावंधिया, कृषी संशोधक तथा उपाध्यक्ष भारत कृषक समाज महाराष्ट्र डॉ. रमेश ठाकरे, शेतकरी समस्यांच्या अभ्यासक प्रज्वला तट्टे, शेतकरी प्रतिनिधी ग्रामगीता प्रचारक पौर्णिमा सवाई आदींनी शेतकरी मारक समस्यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून विविध उपाययोजना सुचविल्या.

आवश्यक वस्तू कायदा, भूमी अधिग्रहण कायदा, सिलिंग कायदा इत्यादी शेतकरी विरोधी कायदे रद्द केल्याशिवाय इतर सर्व उपाययोजना या केवळ कारण सोडून लक्षणांवर उपचार ठरत आहेत, त्यामुळेच सरकारच्या उपाययोजना वांझ ठरत असल्याचे परखड मत शेतकरी विरोधी कायद्यांचे अभ्यासक अमर हबीब यांनी व्यक्त केले.

या परिषदेत सुचविण्यात आलेल्या समस्या आणि उपाययोजना यांचे निवेदन सरकारला देऊन त्याचा कायम पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे मत सुधाकर इंगोले यांनी व्यक्त केले.

कुणबी सेना ही विशिष्ट जातीची संघटना नसून अखिल शेतकरी वर्गाचा लढा व केवळ शेती व शेतकरी प्रश्नांना वाचा फोडणारी संघटना आहे. या परिषदेत प्राप्त उपाययोजना अमलात आणण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा कृती कार्यक्रम तयार करण्यात येईल, असे मत कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी बोलून दाखविले.

या परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत अमर हबीब लिखित शेतकरी विरोधी कायदे पुस्तिकेच्या ‘किसान विरोधी कानून’ या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन करून उपस्थितांना वाटप करण्यात आले.

यावेळी कुणबी सेना संघटनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील ( मुंबई), सरचिटणीस डॉ. विवेक पाटील, कुणबी बहुजन स्वराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे (अमरावती), सचिव सुधाकर इंगोले, कोषाध्यक्ष दत्तात्रेय ठाकरे, निर्भीड दैनिक चे मुख्य संपादक सेवकराम राऊत, कुणबी सेनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष घनश्याम निखाडे, शेतकरी साहित्यिक संदीप धावडे दहिगावकर (वर्धा), रुद्र ग्रामीण पतसंस्थाध्यक्ष संदीप भोंगाडे, एचडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापक मनिष अडागळे, ज्ञानेश्वर तसरे,राजेंद्र बोढे,इंदू भुबट,पौर्णिमा सवाई, प्रा. भास्कर खरात, सुभाष साळवे,विजय सवाई,गिरीश सहस्रबुद्धे,राहूल सातपुते,श्रीकांत मुसळे,संजय आलोडकर, प्रणय पराते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

बातमी संकलन : किशोर गणवीर 

Previous articleउभ्या ट्रक ला दुचाकीची धडक, चालक जागीच ठार
Next articleबुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य धम्मरैली व भोजनदानाचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here